skip to main |
skip to sidebar
का मन हे स्वप्नात रमते ... का वेड्या आशा जागविते ... का नजरेस कोणाच्या भूलते ... उगीच कोणासाठी तरी झुरते ! कधी होते कठोर पाषाणाहूनी ... कधी हळवे होऊनी रडते ... आठवणींना जुन्या कुरवाळते कधी ... कधी बेधुंद होऊनी हसते ! कोणी अनोळखी येता जीवनी ... जीव ओवाळूनी टाकते ... विश्वासघात होता अचानक ... "आपले कोण?" उत्तर शोधत राहते ! कोणी निघूनी जाई दूर ... उधळूनी सारी रंगीबेरंगी स्वप्नं ...वेडे मन हे असे फसते अन् वेदना अंतरी कायम जपते !!! का मन हे स्वप्नात रमते ... का वेड्या आशा जागविते ... ----- स्वाती
प्रियकराच्या भूमिकेतून कविता लिहीण्याचा प्रयत्न केला आहे . काय जादू केली अशी तू .. मी न राहिलो माझा जिथे पाहतो तिथे आता भास होई प्रिये तुझा ॥ ती पहिली भेट, पहिली नजर, सारे काही सुंदर स्वप्नापरी एक एक क्षण बेधुंद.. ह्रुदयी जपून ठेवण्यापरी आतुर मन हे मिलनासाठी, नको पाहू अंत माझा .... जिथे पाहतो तिथे आता भास होई प्रिये तुझा ..... ॥ १ ॥ शब्दाहूनी नजरेतूनच भाव अंतरीचे उमजले गोड हसलीस पाहूनी जेव्हा, गुपित सारे उलगडले खळी गुलाबी गालावरची, घेईल गं प्राण माझा .... जिथे पाहतो तिथे आता भास होई प्रिये तुझा ..... ॥ २ ॥ काही नको आता मजला, हवी आहे तुझी साथ स्वप्नातील राजकुमारी तू ... येशील ना जीवनात ? मिठीत येऊनी अलगद दे प्रितीचा इशारा तुझा जिथे पाहतो तिथे आता भास होई प्रिये तुझा ..... ॥ ३॥ स्वाती
एका प्रियकराच्या भूमिकेतून कविता लिहीण्याचा प्रयत्न केला आहे .... रूप तुझे नक्षत्रापरी भासे गं सोनेरी लावण्याने तुझ्या भूलवत रहा अशीच ! दिवस रात्र आता पाहतो तुझीच स्वप्नं स्वप्नांच्या हिंदोळ्यात झुलवत रहा अशीच ! गुलाबी पाकळ्यांतूनी चमकती जणू मोती लाजत मुरडत गालात हसत रहा अशीच ! विसरूनी जग सारे हरवलो तुझ्या डोळयात तूही मिसळूनी डोळे पहात रहा अशीच ! नको दुरावा एका क्षणाचाही सखये .... सहवास करी धुंद तुझा .. जवळ रहा अशीच ! मिठीत तुझ्या येई अनुभव स्वर्गसुखाचा चांदण्या रात्री आज या बिलगून रहा अशीच !!
तुझ्या डोळ्यात होती जादू .. तुझ्या शब्दांमध्ये होती जादू , तुला पाहिल्यापासून सुचतच नाही .. काय करू ??? मन झाले आहे वेडेपिसे .. फक्त तुला भेटण्यासाठी ! तुझ्या डोळ्यात बघताना .. स्वतःला विसरण्यासाठी ! मिटले जरी डोळे तरी.. समोर फक्त तूच आहेस , उघड्या डोळ्यांमध्ये ही आता तुझेच स्वप्नं आहे ... ह्रुदयात कधी घर केलेस .. माझे मलाच कळले नाही ! खरोखर .. आजपर्यंत कोणाशीही सूर असे जुळले नाही !!!
मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली ... आणि बघता बघता एक कविता जन्मास आली ! कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी ! नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली, आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी ... मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी , थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली... आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली ! कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी, आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी ... आपल्या भावना समजून घेणारी ! शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व, ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व !
तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण जणू अनमोल मोत्यासारखा.... तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण ह्रुदयात जपून ठेवण्यासारखा... तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण हवाहवासा वाटणारा... तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण मन मोहवून टाकणारा... तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण वाटे कधीच संपू नये... तुझ्या सहवासात मी असेच स्वतःला विसरून जावे !!!
ढग दाटताच तुझ्या आठवणींचे, मन आभाळा सारखं भरुन येतं ... जसा पावसासाठी चातक पक्षी, तसं मन तुझ्या भेटीसाठी आतुर होतं... विरहाच्या उन्हात कोमेजलेलं मन, तुझ्या सहवासातील वर्षावाच्या जाणीवेने फुलुन येतं... मोर जसा पावसाच्या स्वागतासाठी पिसारा फुलवून नाचू लागतो माझंही मन तुझ्या दर्शनाने असंच आनंदाने बहरतं ... तुझ्या प्रितीच्या सरींमध्ये भिजून... मन धरती प्रमाणे हिरवंगार होऊन जातं, मात्र पावसानंतर जेव्हा तेच विरहाचं ऊन पसरतं... वेडं मन पुन्हा एकदा तुझ्या भेटीची वाट पाहू लागतं !!!
नाजूक हळवं मन ... ओल्या पापण्या, भरून आलेलं आभाळ ... मुसळधार धारा. भयाण काळोखी रात्र ... दूरवर सर्व शांत, खवळलेला समुद्र ... खोलवर ह्रुदयात. निर्विकार चेहरा ... उद्धवस्त झालेली स्वप्नं, भकास डोळे ... अंतर्मनात घोंघावणारं वादळ जीवाची घालमेल ... रूतून बसलेलं दुःख, ओठांवर परकं हसू ... कोणीच नाही ज्याला म्हणावं आपलं. जीवनाशी तडजोड ... का ? कशासाठी ? आकांत जीवाचा ... मुक्त होण्यासाठी !!!
अंकुर प्रेमबंधाचा असा ह्रुदयी रूजावा ... सुगंध प्रीतफ़ुलांचा अविरत जीवनी बहरावा ! प्रत्येक शब्द तुझा मधूर मधूर स्वर व्हावा ... ओठातूनी तुझ्या प्रणयगीतांचा नाद यावा ! तुझ्या स्पर्शाने असेच भान माझे हरावे ... कवेत तुझ्या रे सख्या जग सारे विसरावे ! चांदण्या रात्री फ़िरताना भेट पहिली आठवावी ... जादू त्या मोहक क्षणांची पुन्हा फ़िरूनी अनुभवावी ! बंध हे नाजूक रेशमी युगानुयुगे जुळत रहावे क्षण तुझ्याविना जगण्याचे जीवनी कधी न यावे !!!
काय जादू असते या पावसात ? तो येताच नाचू लागते मन हे आनंदात पाऊस म्हणजे तू .. कधी मला वाटतं तोही येतो तेव्हा, मन वेडं होऊ लागतं. आठवतं.. त्याची चातकाप्रमाणे वाट पहाणं, तो बरसू लागताच, बेधुंद होऊन गाणं. तोही तुझ्यासारखाच थोडासा खट्याळ.. पहावंसं वाटलं की दडून बसतो ढगांच्या आड. ऐकतच नाही कधी कधी, खूप खूप सतवतो .. पण जेव्हा बरसतो, तनमन सुखावून जातो. तुझ्या आठवणी ही पावसासारख्याच ... कधी रिमझिम तर कधी मुसळधार . ये ना आता लवकर, कळत कसं नाही तुला, कोमेजून गेले आहे मी या विरहाच्या उन्हात. नको असा त्रास देऊ, जाऊ नकोस दूर दूर .. माझ्या ह्रुदयी बनून रहा तू प्रीतीचा महापूर !!!
दिले होतेस वचन तू मग ...साथ सोडूनी गेलास का ? जीवनाच्या प्रवासात ...अर्ध्यावर निघूनी गेलास का ? जखम अशी देऊनी गेलास, जी कधी भरणार नाही का दिल्यास वेदना अशा, ज्यांचा अंत होणार नाही स्वप्ने काचेची सजवूनी, चूरचूर करूनी गेलास का ? दिले होतेस वचन तू मग ...साथ सोडूनी गेलास का ? खोट्या साऱ्या आणाभाका .. प्रेमही ते खोटेच होते अश्रू, वेदना, एकटेपणा .. हेच का सारे नशीबी होते बंध नाजूक प्रीतीचे असे तोडूनी गेलास का ? दिले होतेस वचन तू मग ...साथ सोडूनी गेलास का ?
आजकाल स्वप्नंही घाबरू लागली आहेत डोळ्यात उतरण्यासाठी ......... कारण त्यांना ठाऊक आहे एक दिवस आपण कोमेजून जाऊ वास्तवात कुठेच जागा नाही आपल्यासाठी ! कारण ज्याच्यासाठी सारी स्वप्नं पाहिली तोच निघून गेला आहे साथ सोडून ...... जी सजवली होती डोळ्यात दोघांनी त्या साऱ्या स्वप्नांना चूरचूर करून ...... म्हणून आता ठरवलं आहे स्वप्नं पहायची पण फक्त आपल्यासाठी कोणाला हक्कच द्यायचा नाही आपल्या स्वप्नांना पायदळी तुडवण्यासाठी
तिने नेहमी प्रयत्न केला सर्वांचे अश्रू पुसण्याचा .... पण तिच्या भिजलेल्या पापण्या कोण पुसणार ? कदर केली तिने प्रत्येक वेळेस इतरांच्या भावनांची .... पण तिच्या थिजलेल्या भावना कोण पुन्हा फुलवणार ? किती दिवस सहन करेल ती या असह्य वेदना ..... अन् कधीपर्यंत करेल हसण्याचा प्रयत्न केविलवाणा ? होईल का कधी अंत तिच्या या दुःखांचा ? की जन्मभर भोगावी लागेल तिला न केलेल्या चुकीची शिक्षा ???
कोणी विचारलं जर मला ... प्रेम म्हणजे काय ? तर मी सांगेन ...... प्रेम म्हणजे तू !! कारण .......... प्रेम तुझ्या हळव्या शब्दांमधून पाझरतं तुझ्या मधूर सूरांमधून रूणझूणतं प्रेम तुझ्या डोळ्यांमध्ये दिसतं तुझ्या रेशमी स्पर्शामध्ये जाणवतं म्हणून माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या आहेस तू .... कोणी विचारलं जर मला ... प्रेम म्हणजे काय ? तर मी सांगेन ...... प्रेम म्हणजे तू !! प्रेम म्ह्टलं की दिसतो चेहरा तुझाच प्रेम म्हटलं की येतो विचार तुझाच प्रेम म्हणजे तुझा असलेला माझ्यावरचा विश्वास तुझ्या श्वासात गुंतलेला माझा श्वास !!!! म्हणून .... कोणी विचारलं जर मला ... प्रेम म्हणजे काय ? तर मी सांगेन ...... प्रेम म्हणजे तू !!
का होतं मन असं हळवं कोणाच्या तरी आठवणीने ? एक एक क्षण का वाटे युगासमान, त्याच्या दूर जाण्याने ? भेटीनंतरही का ..... भेटण्याची आस असते ? त्याच्याच गोड स्वप्नांमध्ये का रात्र सारी हरवते ? त्याने फक्त आपल्यालाच पहावं, आपल्याशीच बोलावं.. असं काही वाटू लागतं प्रत्येक छोटी गोष्ट ही त्यालाच सांगावी म्हणून मन आतुरतं कळलं का तुम्हाला, अचानक असं वेड्यासारखं का होतं ? दुसरं काही नाही ......... यालाच तर म्हणतात " प्रेमात पडणं "
काय जादू असते या पावसात ? तो येताच नाचू लागते मन हे आनंदात पाऊस म्हणजे तू .. कधी मला वाटतं तोही येतो तेव्हा, मन वेडं होऊ लागतं. आठवतं.. त्याची चातकाप्रमाणे वाट पहाणं, तो बरसू लागताच, बेधुंद होऊन गाणं. तोही तुझ्यासारखाच थोडासा खट्याळ.. पहावंसं वाटलं की दडून बसतो ढगांच्या आड. ऐकतच नाही कधी कधी, खूप खूप सतवतो .. पण जेव्हा बरसतो, तनमन सुखावून जातो. तुझ्या आठवणी ही पावसासारख्याच ... कधी रिमझिम तर कधी मुसळधार . ये ना आता लवकर, कळत कसं नाही तुला, कोमेजून गेले आहे मी या विरहाच्या उन्हात. नको असा त्रास देऊ, जाऊ नकोस दूर दूर .. माझ्या ह्रुदयी बनून रहा तू प्रीतीचा महापूर !!!
न मागताच तू खूप काही दिलेस .......... पहाटेच्या गुलाबी थंडीत आठवणींची ऊबदार रजई दिलीस चांदण्यांच्या शीतल प्रकाशात उजळणारी स्वप्नांची रात्र दिलीस एका क्षणातच जणू आयुष्य जगण्याचा हर्ष दिलास दुःखी निराश मनाला मायेचा हळूवार स्पर्श दिलास आकांक्षांचे ढासळलेले मनोरे पुन्हा एकदा उभे केलेस हरवलेले सूर छेडूनी अंतरी प्रीतीचे गीत फुलविलेस आयुष्यात ज्याची कमी होती ते सारे काही पदरात टाकलेस एका कोमेजलेल्या कळीला जणू पुन्हा नवजीवन दिलेस काही उरलेच नाही आता मागण्यासारखे ... खरंच ... न मागताच तू खूप काही दिलेस !!!
चल ऊठ ... रडतेस काय ??? होऊ नकोस अशी हताश .... सोडू नकोस जिद्द ... बसू नकोस होऊन निराश ओढून घे एक हसरा मुखवटा .. तुझ्या या दुःखी, रडवेल्या चेह-यावर पिऊन टाक तुझ्या अश्रूंचा एक एक थेंब गिळून टाक सारी किल्मिषं .. राग द्वेष दाबून ठेव तुझ्या ह्रुदयातील भावनांचे उद्रेक या सा-या गोष्टींना इथे काहीच किंमत नसते गं वेडे ... तुला अजून ही कसं नाही कळलं ??? कोणास सांगशील तगमग तुझ्या मनाची ? कोणास दाखवशील घालमेल तुझ्या जीवाची ? कोणीच नसतं अशा वेळी पाठीवरून हात फिरवणारं प्रेमाने जवळ घेऊन आपले अश्रू पुसणारं म्हणून तूच आता सावर स्वतःला ... अशी मोडून जाऊ नकोस कितीही वादळं आली तरी आयुष्याची वाट सोडून जाऊ नकोस उभी रहा पुन्हा एकदा ... नवीन सुरूवात कर सगळ्या अडीअडचणींवर खंबीरपणे मात कर कोणी साथ दिली नाही तरी मी नेहमीच तुझी साथ देईन तुझंच मन आहे मी ... हरवलीस कधी तर वाट दाखवून देईन
कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं यातला फरक समजू लागतो नाही नाही म्हणता आपणही प्रेमात पडू लागतो कधी हसणं विसरून गेलो तर ते हसायला शिकवतात जीवन हे खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात.... आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची, प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी म्हणूनच ........ असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा " I LOVE YOU "
पहिल्या पावसात भिजताना, त्या रोमांचित एकांतात नजरेनेच म्हणालास .... जवळ ये अशी जरा ... मिठीत घेतो सामावून दोघांची मनंही जरा चिंब होऊ देत ना भिजून बुडालेच होते आकंठ तुझ्या प्रणय सागरात मीही मग कशी म्हणू शकले असते तुला " नाही " वाराही खट्याळ झोंबत होता अंगाला राहिलेच नाही मग अंतर दोघांत जरा सरींवर सरी ओघळती गालावरी नजर तुझी खिळली अधरांवरी लाज लाजूनी मी पुरती अशी मोहरले विसरूनी सारे काही तुझ्या बाहूपाशात हरवले आता तू नसताना ......... राहून राहून सारे आठवते भिजलेले क्षण ते मोरपिशी पुन्हा ह्रुदयी साठवते !!!!
मी एक नाव भरकटलेली ... या अथांग खोल समुद्राच्या मधोमध हेलकावते आहे एकटीच ...... आजूबाजूला एक चिटपाखरू ही नाही मदतीसाठी झुंजते आहे अविरत प्रचंड लाटांशी लढते आहे अखंड वादळवाऱ्य़ाशी शोधते आहे किनारा ... जीव पणाला लावून एकच प्रश्न सतत आहे मनाला भेडसावून मिळेल का कधी किनारा ??? की गिळंकृत करेल हा समुद्र एक दिवस मला ???
मीही प्रयत्न केला होता, आयुष्याच्या कॅनव्हासवर एक सुंदर चित्र रेखाटण्याचा ... पण कोणास ठाऊक कसे रंग सारे चित्रामधील उडून गेले, ध्यानीमनी जे नव्हते अकल्पित असे सारे घडले . त्यानंतर कधीच त्या कॅनव्हासवर रंग पुन्हा सजले नाही, कारण .. कुंचल्याला रंगांची साथ कधी मिळालीच नाही . आज ना उद्या.. चित्र पूर्ण होईल एक वेडी आशा मनात होती, पण शेवटपर्यंत तीही एक कल्पनाच बनून राहिली....... आणि आता उरला आहे तो फ़क्त एक कोरा कॅनव्हास !!!!
तू नसशील तेव्हा ....... फुलेल का असाच हा वसंत ॠतू ? गुंजतील का तुझे मधूर स्वर कानी ? तू नसशील तेव्हा ....... सुचतील का अशाच प्रितीच्या भावपूर्ण कविता ? बहरेल का अशीच माझ्या अंतरीची रातराणी ? तू नसशील तेव्हा ....... हरवेल का तहान भूक तुझ्यासाठी ? जागतील का तुझ्या आठवणीत माझ्या रात्री ? नाही ..... शक्यच नाही तू नसशील तेव्हा ....... असं काहीच होणार नाही कारण तू नसशील तेव्हा ....... सांग ना , मी तरी कशी असेन ???
किती दिवसात ....... तुझ्या प्रितीच्या गंधाने मोहरले नाही तुझ्या रेशमी मिठीत हरवले नाही किती दिवसात ........ तुझ्या डोळ्यांमधे खोलवर बुडाले नाही मन भरभरून तुला पाहिले नाही किती दिवसात ........ तुझ्या मखमली स्पर्शाचे मोरपीस फिरले नाही तुझ्या श्वासांच्या लयीत बेधुंद झाले नाही किती दिवसात ......... तुझ्यात एकरूप झाले नाही मी स्वतःलाच भेटले नाही
आज तुला भेटले ........ आणि येताना तुझा सुगंध घेऊनच परतले कितीतरी वेळ त्याच सुगंधाने मोहरत राहिले दिवसभर तुझ्याच आठवणीत रमत राहिले स्वतःशीच हसत होते ... आरशात बघून लाजत होते ... मनातल्या मनात काहीतरी गुणगुणत होते... तुला भेटता जणू आज मीच मला नव्याने गवसले , वाटले सुन्या मैफ़िलीत जसे कोणी सूरांचे रंग उधळले !!!
खरंच खूप आवडतं मला ... जेव्हा तू माझी आतुरतेने वाट बघतोस मग मी विचारते ... सांग ना का वाट बघतोस अशी ? तेव्हा तू म्हणतोस " कारण तू आवडतेस मला " तुझे हे चार शब्दच माझ्यासाठी सर्व काही असतात दुःखाच्या क्षणांमधे ही जे मनाला दिलासा देतात त्या क्षणी खरोखर लाखो आनंद-लहरी उमटतात मनात हेच शब्द आयुष्याच्या खडतर वाटेवर जगण्याचं बळ देतात म्हणून पुन्हा एकदा म्हणशील का ? " कारण तू आवडतेस मला " पुन्हा एकदा ........... पुन्हा एकदा ...........
कितीदा तरी मारलं आहे मी तिला खरं तर मनाविरूध्दच .......... मनातल्या मनात कोंडून जीव घेतला तिचा मला उमलायचं आहे असं म्हणत असतानाही नाही जगू दिलं तिला .......... नाही बहरू दिलं तिला ......... पण का प्रत्येक वेळी आपणच बळी द्यायचा तिचा दुसऱ्यांचा विचार करताना आपला विचार कधी करायचा ? आपल्या मनातील भावनांना कधी वाव द्यायचा? म्हणूनच मीही ठरवलं आहे......... तिला आता बहरू द्यायचं तिलाही हळूवार फुलू द्यायचं आणि तिच्याबरोबर आपणही फुलत जगायचं !!!
भाव जे मनात तुझ्यासाठी ... आहेत सारे शब्दांच्या पलीकडे, कसे आणू सांग मी ओठी ... शब्दही पडती रे अपुरे ! पहा कधी .. नजरेस मिळवूनी नजर असेल तेथे प्रतिमा तुझीच, या थरथरणाऱ्य़ा ओठांवरही .. असेल तुझेच प्रणय गीत ! कधी निसटत्या स्पर्शातही... जाणवेल ओलावा प्रीतीचा, कधी माझ्या श्वासात पहा.. मिसळूनी स्वर तुझ्या श्वासांचा ! अंकुर हा प्रेमबंधाचा ... तुझ्याही ह्रुदयात रूजेल का ? कळी आपल्या प्रीतीची सांग मला उमलेल का ?
आई .......... तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन रडावं इतकंही भाग्य नाही गं माझं तू कशी मोकळी होतेस सारं काही सांगून पण..... माझं दुःख मी तुला सांगावं इतकंही धैर्य नाही गं माझ्यात मला ठाऊक आहे मी जशी आतून कोसळले आहे तशीच तूही कोसळशील ........... म्हणूनच मी शांत आहे सगळी दुःख आतल्या आत खोलवर दडवून पण खरंच आज ....... खूप खूप रडावंसं वाटतंय तुझ्या कुशीत येऊन !!!!!!!!!!
हरवले स्वप्नांच्या जगात.. धुंद झाले आज अशी, सत्य होते की स्वप्नं ... सांग मला भेट आपली ! भाव डोळ्यातले तुझ्या, वेड मजला लावून गेले ... मिटलेले ओठ तुझे ... गुपित सारे सांगून गेले, का वाटले असे, नाते आहे काही जन्मोजन्मीचे ? प्रत्येक शब्दात तुझ्या, सूर होते आपुलकीचे ... शब्द माझे, सूर तुझे... मिळूनी होईल सुंदर गाणे, तुझ्यासाठीच ह्रुदय माझे.... गात आहे प्रेमाचे तराणे !!!
आज फक्त तू, मी आणि आहे श्वासात गुंतलेला श्वास ... पुन्हा नाही मिळणार कदाचित हा रोमांचित एकांत ! म्हणूनच ...... आज तुला जे काही बोलायचंय ते सारं बोलशील का ? स्वतःला विसरून फक्त माझ्या डोळ्यांमधे हरवशील का ? हातात हात घेऊन मनातील सारे भाव सांगशील का ? गुपित तुझ्या ह्रुदयातील सांग ना उलगडशील का ? सर्व दुःख यातना विसरून मनापासून हसशील का ? झुगारून सारी बंधनं फक्त माझाच होऊन राहशील का ? कारण ....... आज फक्त तू, मी आणि आहे श्वासात गुंतलेला श्वास ... पुन्हा नाही मिळणार कदाचित हा रोमांचित एकांत !!!
जेव्हा कोणीच नसतं माझ्याबरोबर हसणारं.... माझं दुःख समजून प्रेमाने जवळ घेणारं ... तेव्हा माझ्या कविता माझ्याशी बोलू लागतात, त्याच माझ्याबरोबर हसतात, त्याच माझ्याबरोबर रडतात... धीर देऊन सांगतात.. तू नाहीस एकटी, घेऊन येतात बरोबर खूप साऱ्या आठवणी. आठवणींच्या जगात फिरताना दुःख मनातले विरून जाते, मात्र तिथून परत येताना अंतःकरण जड होते. वास्तवाशी सामना करताना मनाला थोडं समजवावं लागतं... मनातले दुःख लपवून चेहऱ्यावर हसू फुलवावं लागतं !!!
आयुष्याच्या एकाकी वळणावर ... तू असा अचानक भेटलास, कळलेच नाही कधी झाले, मैत्रीचे रूपांतर प्रेमात. प्रेमाची मोहक दुनिया पाहण्याचा मोह मनाला होताच, पण वाटले नव्ह्ते कधी ... स्वप्नंही येईल प्रत्यक्षात. स्वप्नातील राजकुमार अचानक असा समोर येईल, प्रेमाच्या जादुई नगरीत आपल्याबरोबर घेऊन जाईल आगमनाने तुझ्या... आयुष्यच माझे बदलले, रखरखीत ऊन्हात जसे, सप्तरंगी इंद्रधनुष्य फुलले !!!
पहाटे पहाटे जेव्हा किरणे तुझ्या प्रेमाची, पसरतात माझ्या ह्रुदयाच्या आकाशात.. तेव्हाच तुझ्या आठवणींचे दंवबिंदू , मनाच्या हिरवळीवर चमकू लागतात ! मन अधिकच हळवे होते , भरून आलेल्या आभाळासारखे .. तुला पाह्ताच खुलते मग, सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे ! जेव्हा पर्वतरांगेवर झुकतात ते काळेभोर नभ, भासतात जणू प्रेमी मिलन-आतुर.. वाटते असेच एखाद्या बेधुंद क्षणी, तूही घ्यावेस मला आपल्या मिठीत सामावून !!
इथे प्रत्येकाला आहे आपले दुःख प्रत्येकाची एक वेगळी कहाणी ... दुसऱ्य़ाचे दुःख कोण समजणार ? प्रत्येकाची आहेत आपली रडगाणी ! खूप भेटतात मित्र, सगे, सोयरे.. पण दुःखात सहभागी होणारे अगदी मोजके.. कधी कधी तर आपले जवळचेच वाटू लागतात जणू परके ! अशा वेळी कोणी अनोळखीच जास्त जवळचा वाटू लागतो... आपल्या मनातल्या जखमांवर जो हळूवार फुंकर घालतो ! वरवर बोलणारे अनेकजण भेटतात.. पण असा एखादाच असतो ... जो तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करून जातो ! तुमच्या हसऱ्य़ा मुखवट्यामागचा खरा चेहरा जो बघू शकतो !!!
आठवणी तुझ्या... जणू पावसाच्या सरी, धुंद होते त्या सरींमध्ये चिंब चिंब भिजुनी ! आठवणी तुझ्या... जणू इंद्रधनू सप्तरंगी, प्रत्येक रंगात तुझ्या जाते मी रंगूनी ! आठवणी तुझ्या... जसा हा निसर्ग हिरवा, हवाहवासा वाटतो तुझ्या प्रितीचा गारवा ! आठवणी तुझ्या... म्हणजे झुळझुळ वाहणारी नदी, तुषार प्रितीचे तुझ्या झेलते मी अंगावरी ! आठवणी तुझ्या... म्हणजे काळे काळे ढग, दाटून आले की... वाहू लागते अश्रूंची सर !!!!
जे सांगायचे आहे मला , ते न बोलता तुला कळेल का ? पाहते आहे जे स्वप्न मी ... तेच स्वप्न तुला ही पडेल का ? कविता माझ्या प्रितीची , तुला कधी समजेल का ? तुझेही ह्रुदय माझ्यासाठी ... सूर प्रेमाचे कधी छेडेल का ? बोलू नकोस काहीच ... पण फक्त् नजरेचा एक इशारा देशील का ? मी केलं आहे तितकंच प्रेम तूही कधी माझ्यावर करशील का ???
पूर्वी कधीच हे झाले नाही .. जे आता घडले आहे , पहिल्याच् भेटीत तुझ्यावर, मन माझे जडले आहे ... तुझी स्वप्नं ... तुझे विचार आता जग माझे हेच ! तुझ्या आठवणींमध्ये, ना राहिले भान कसलेच ! लाजते आहे आता मी .. माझंच रूप न्याहाळताना पाहते आहे कारण आता .. तुझ्या नजरेतून मी स्वतःला !!!
पावसाची रात्र नशीली ... आणि हवास तू जवळी धुंद व्हावे तन मन आपुले ... रिमझिम सरींच्या तालावरी बेहोश व्हावे भिजूनी चिंब ...भान नसावे दोघांनाही अलगद ओठांनी टिपावेस तू , थेंब माझ्या गालावरी मिळता नजरेस नजर... ओठ थोडे थरथरावे , हात घेऊनी हातामध्ये, सारे जग विसरावे ... रेशमी स्पर्शाने तुझ्या ... अंगअंग मोहरूनी यावे, होऊनी रोमांचित दोघांनी, बाहूपाशात हरवावे ... तुझ्या ऊबदार मिठीतली ... रात्र कधीच उलटू नये , विरहाचं ऊन पसरवणारी ... अशी सकाळ कधी येऊच नये !!!!!!!
का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात ? सुखाची फ़ुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर ... तरी ते मात्र आपल्याला, दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात ! हसवत ठेवले जरी आपण नेहमी त्यांना ... तरी ते मात्र नेहमी आपल्या डोळ्यांना अश्रूच देतात ! सोबत केली त्यांच्या गरजेच्या वेळी आपण ... तरी ते मात्र आपल्याला एकटं सोडून निघून जातात ! आपण त्यांच्या आठवणीत रात्रंदिवस झुरलो तरीही ... ते मात्र आपल्याला विसरून सुखाने जगतात ! का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात ?
रागवणार नसशील तर एक गोष्ट सांगू का तुला ? खरंच तुझी कधी आठवणच येत नाही मला ...... ऐकायचं असेल जर तुला कारण याचं , सांगते आज मी तुला अगदी खरं खरं .... कोणाची आठवण येण्यासाठी , आधी त्या व्यक्तीला विसरावं लागतं पण तू तर माझ्या ह्रदयात, रोमारोमात पूर्णपणे भिनलेला आहेस .... मग सांग मला तुझी आठवण कशी येणार ? जर तू प्रत्येक क्षणी माझ्या विचारांमध्येच आहेस जर मी तुला विसरूच शकत नाही.... तर मला तुझी आठवण कशी येणार ? म्हणूनच तूही कधी म्हणू नकोस ... की मला तुझी आठवण येते कारण त्या क्षणी तू मला, थोडा वेळ का होईना पण विसरून जाशील ! म्हणूनच पुन्हा कधी म्हणू नकोस ... की मला तुझी आठवण येते !!!!!!!!!!!
आजकाल सगळ्यांपासून दूर राहू लागले आहे ... एकटीच बसून फ़क्त तुझाच विचार करू लागले आहे, भर दिवसा चांदण्या रात्रीची स्वप्नं पाहू लागले आहे ... कोणी सांगेल का .... काय मला झाले हे ??? सगळेच आपले आता परके वाटू लागले आहे ... तुझ्याजवळ राहण्यासाठी, मन बहाणे शोधू लागले आहे, तुझ्याशी बोलताना मन धुंद-धुंद होऊ लागले आहे... कोणी सांगेल का .... काय मला झाले हे ??? तुला पाहताच तुझ्या डोळ्यांमध्ये हरवू लागले आहे... तुझ्याच प्रितीचे सूर ह्र्दय छेडू लागले आहे, काय सांगू पण आता मी माझी न राहिले रे ... कोणी सांगेल का .... काय मला झाले हे ???
तुझा सुगंध दरवळतो ... माझ्या प्रत्येक श्वासात ! तुझ्याच प्रितीच्या कळ्यांची नक्षी ... माझ्या ह्रुदयाच्या अंगणात ! चांदणे, मधुर शब्दांचे तुझ्या ... पसरले या अंधारया मनात ! गुंजत आहेत सूर तुझेच ... अंतर्मनाच्या गाभारयात ! भारून टाकलेस असे काही ... भिनला आहेस तूच रोमारोमात ! उरले नाही कुठेच मी आता ... फ़क्त तूच आहेस माझ्या सर्वस्वात !!!
रोषणाई आहे आज बाहेर तरीही ... का विझले आहेत मनातील दिवे ? आनंद उल्हास दिसतो आहे सगळीकड़े, मग का माझ्या डोळ्यात अश्रू तरळले ? रंगी बेरंगी फुलानी सजले हे घर पण का प्रीतीचे फूल असे कोमेजुन गेले ? सुबक रांगोळी रचली या हातानी ... पण चेहरया वरचे रंग का नाही खुलले ? आजूबाजूला आहेत सारेच जण ... तरी हळव्या मनात कोंणाची आठवण आहे ? कळत नाही मला, सारे काही मिळूनही आज .... कुठल्या गोष्टीची कमी जाणवते आहे ???
आठवते का तुला, आपली भेट पहिली ? माझ्या आणि तुझ्याही मनात एक वेगळीच धडधड होती बोलण्यात थोडा संकोच होता, पण वाटले जणू पूर्वीची ओळख होती.. एका नवीन आपुलकीच्या नात्याची ती सुरुवात होती ... दुसरया भेटीत ...भेटूनही अधिक सहवासाची इच्छा राहिली होती ! तुझं बोलणं, हसणं.. तुझ्याबरोबर चालणं सगळं हवंहवंसं वाटलं होतं ... तुझ्या डोळ्यातले भाव न बोलता खूप काही सांगून गेले, माझ्या डोळ्यांना अगणित सुंदरशी स्वप्नं देऊन गेले !!!
तू आलास आयुष्यात असा ...... जणू काळ्याकुट्ट रात्रीनंतर यावी एखादी प्रसन्न सकाळ, जसा अमावास्येच्या अंधारानंतर पसरावा चांदण्यांचा शीतल प्रकाश. तू आलास आयुष्यात असा ...... जशी रखरखीत उन्हामध्ये यावी रिमझिम पावसाची सर, जशी उदास अंतरी उठावी एक आनंदाची लहर. तू आलास आयुष्यात असा ...... जसे अंधारलेले मन लाखो दिव्यांनी जावे झगमगून जसा भरून आलेल्या आभाळातही हळूच चंद्र दिसावा ढगांच्या आडून. तू आलास आयुष्यात असा ...... जसे संथ पाण्यामध्ये उठावे हजारो तरंग, जशी निराश झालेल्या मनी जागून यावी जगण्याची उमंग !
आनंदाचा एक अश्रू .. ओघळला डोळ्यातून जेव्हा हळूच घेतलेस तू मिठीत जवळ ओढून .. ओठांनी तुझ्या टिपलास जेव्हा अलगद तो थेंब नव्हते अंतर जराही .. दोन जीव जणू झाले एक वाटले हा मोहक क्षण, असाच इथे थांबून रहावा नको आता तुझ्या माझ्यात.. पुन्हा कधी दुरावा सहवासात तुझ्या फ़ुलली अशी कोमेजलेली ही कळी, अचानक एखाद्या रात्री जशी बहरून यावी रातराणी .. हरवूनी तुझ्या बाहूपाशात .. झाले रे मी परिपूर्ण जीवनास अर्थ लाभला माझ्या, देऊनी तुला सर्वस्व !
तोच आहेस तू ... अन तीच मी ... तरीही का वाटते ही रात्र आज नवी ? घेऊनी आली निशा जणू संदेश मिलनाचा एकमेकांत पुन्हा नव्याने आज विलीन होण्याचा तुझा स्पर्शही वाटतो रे आज नवा नवा श्वासात जाणवे तुझ्या, प्रणयाचा गारवा लाभली आज अशी स्वप्नातील ही चांदरात अधीर मिठीत तुझ्या न राहिले मजला भान चांदणे शीतल नभातले ही सांगते ... जागवावी आज ही रात्र एकांताची नजरेचे इशारे म्हणती रे सजणा , नको तोडू ही साखळी तुझ्या बाहूपाशाची विसरू आता सारे काही ... या मिलनाच्या बेधुंद क्षणी , मोरपिशी क्षण हे रोमांचित ... ठेऊ ह्रुदयात कायमचे साठवूनी !
सखया रे, प्रितीत तुझ्या बदलून गेले आयुष्य काही असे ... काट्यांच्या वाटेवर जणू पसरावे फ़ुलांचे मखमली गालिचे, तुला भेटता .. वाटले मीच मजला गवसले नव्याने, वाटू लागले तेच आयुष्य आता जगावे पुन्हा नव्याने ... काय केलीस किमया अशी की, तोडूनी बंधने झाले मी तुझी ... तोच तू राजकुमार स्वप्नीचा .. ज्यासाठी इतकी झुरले मी, प्रेमाच्या नगरी, स्वप्नांच्या दुनियेत नेऊनी मज बसविलेस तू, खुडूनी टाकलेल्या कळीस एका ... आज असे फ़ुलविलेस तू बेसूर जीवनाच्या मैफ़िलीत, छेडूनी गेलास सूरेल तराणे आता रोजच हवेसे वाटते, तुझ्या सहवासाचे शीतल चांदणे दूर राहूनी तुझ्यापासूनी कशी होते रे मी बेजार मिलनाचे क्षण आपुले जपते मी ह्रुदयात हळूवार राहो असाच हा गोडवा ... नको दुरावा आता कधीही शेवटच्या श्वासापर्यंत .... असावी फ़क्त साथ तुझी !
ती पहिली भेट चांदण्या रात्रीतली स्मरते अजूनी रे हुरहुर दोन मनातली पहिल्याच भेटीत असे केलेस वार नजरेचे वाटले ऐकतच रहावे स्वर तुझ्या गीतांचे एकटक तुझी नजर खिळली अशी मजवर लाज आली गाली अन् मीही झाले अनावर घायाळ ह्रुदय झाले तुझ्या पहिल्या स्पर्शाने हरवले गुलाबी स्वप्नात त्या नव्या हर्षाने मोहक क्षण तो एक एक कितीदा पुन्हा पुन्हा जगले ती धुंद एकांताची रात्र नाही अजूनी विसरू शकले ........
नाती अनेक प्रकारची असतात पण एखादं नातं असं असतं ज्याला नाही बांधता येत शब्दात नाही अडकवता येत कुठल्याच बंधनात ते असतं स्वैर ............. फ़क्त ह्रुदयाचं ह्रुदयाशी असलेलं नातं !!! त्याचं गहिरेपण नाही कोणी समजू शकत ते केवळ त्या दोन वेड्या जीवांनाच माहित असतं अगदी जगावेगळं ............ कदाचित समाजाच्या रूढींमधे न बसणारं तरीही अगदी हवंहवंसं ... खूपच खास ज्या नात्याला नाही देता येत काही नाव ......... एक असं नातं ......... जसं कोणीतरी अंतर्मनात घर करून रहावं जसं उदास असताना येऊन कोणीतरी हसवावं एक असं नातं ........ जणू अंधाऱ्या वाटेवर दिसावा प्रकाशाचा किरण जणू बेरंगी जीवनात उधळावे कोणी हजारो रंग असं एक सुंदर, हळवं अनामिक नातं ..............
जुळता तुजसवे, अनुबंध प्रीतीचे ... फ़ुलला वसंत ग्रीष्मात, झाले चांदणे शब्दांचे ! मिळता नजर ही नजरेस तुझ्या ... उठले तरंग मनी, स्वर गुंजले प्रेमगीतांचे ! स्पर्श मखमली होता, तनूस या तुझा ... मोहरले मन, लाजूनी झाले मी चूर ! लाभता सहवास तुझा काही क्षणांचा ... जगले जणू आयुष्यच, कशी राहू सांग आता दूर ! जडता नाते ह्रुदयाचे ह्रुदयाशी ... भासले जणू ही गाठ असे जन्मोजन्मीची ! होता मधूर मीलन आपुले ... कळले मज, होती हीच इच्छा नियतीची !